लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच माजी मंत्री पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरून टोला लगावला आहे. आतापर्यंत मनोज जरांगे यांच्या भूमिकेला समर्थन म्हणणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव व लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आता त्यांच्या भूमिकेवर टोला लगावला आहे. कोणतेही आरक्षण बेमुदत उपोषण केल्याने मिळत नसते, आरक्षण देणे हे राज्य सरकारचे काम आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

अधिक वाचा  कॉलर सकाळी उडो की संध्याकाळी, कॉलर… उदयनराजे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला आहे. त्याबाबत अध्यादेश काढून आरक्षणाचा निर्णय घेणे आणि ते कोर्टात टिकवणे हे त्यांचे कर्तव्य, असल्याचे पंकजा मुंडे जाटनांदूर (ता. शिरुर कासार) येथील गुरुवारी (ता. १८) सभेत म्हणाल्या. यावेळी आमदार सुरेश धस, चंपावती पानसंबळ, रोहीदास गाडेकर आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कधीच कोणत्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विरोध केला नाही. आरक्षण हे आर्थिक निकषावर नाही तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर दिले जायला हवे. जिल्ह्याचे प्रश्न खंबीरपणे संसदेत मांडू, कायद्याने ज्या गोष्टी मिळणारच आहेत. त्यासाठी उपोषण करण्याची आवश्यकता नाही, असेही पंकजा मुंडे मनोज जरांगे यांचे नाव न घेता म्हणाल्या.