मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.

विधानसभा राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. तसेच ठराविक कालावधीत आपलं उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांकडून राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर सादर करण्यात आलं होतं.

अधिक वाचा  पूर्वमोसमीच्या अवकाळी सरीमध्ये नगर, नाशिक जिल्ह्यांला गारपिटीचा येलो अलर्ट तर उष्ण लाटेचा येथे बसेल फटका

दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नोटीसला वेळ वाढवून मागितला होता. विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशनाचं कारण सांगून शिंदे गटाच्या आमदारांनी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली होती. त्यानंतर आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांनी आपलं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केलं असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्यानुसार, दररोज एका आमदाराचं म्हणणं राहुल नार्वेकर ऐकून घेणार आहेत.