ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपाप्रकरणी आज चौकशी झाली. गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केल्यानंतर वायकर बाहेर पडले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना वायकरांनी खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टिपण्णी केली.

महानगर पालिकेच्या जागेवर हॉटेल बांधल्याचा रवींद्र वायकर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी भाजप नेते तथा खासदार किरीट सोमय्या यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये वायकर यांनी हा मुद्दा उपस्थित करुन जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा ठपका ठेवला होता.

त्यानंतर आज वायकरांची गुन्हे शाखेने तब्बल पाच तास चौकशी केली. बाहेर आल्यानंर रवींद्र वायकर म्हणाले की, मला जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला जात आहे. परंतु मी कायद्याच्या बाहेर काहीही केलेलं नाही. माझं बांधकाम १९९१च्या जीआर प्रमाणेच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून कायद्यानुसारच वागलो आहे. त्यामुळे मला चौकशीसाठी जिथं बोलावलं जाईल तिथं मी जाणार.

अधिक वाचा  ‘सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय’; पंतप्रधान मोदी

पुढे बोलतांना वायकर म्हणाले की, माझी वरच्या मजल्यावर चौकशी सुरु असतांना किरीट सोमय्या खाली येऊन वरती अधिकाऱ्यांना फोन करत होते. हा विकृत मनुष्य असून त्याच्या निचपणाला मर्यादा नाहीत. विनाकारण लोकांना त्रास देण्याचा हा अद्योग असल्याचं वायकरांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनामध्ये वायकर काय म्हणाले होते?
रविंद्र वायकर म्हणाले होते की, माणुसकीने जगलं पाहिजे, माणुसकीने वागलं पाहिजे. खोटेनाटे आरोप करुन बदनाम करणार असाल तर चुकीचं आहे. आमच्यावर मुंबई महानगर पालिकेच्या भूखंडाच्या बाबतीत सुरुवातीला ५०० कोटींचे आरोप केले. त्यात तथ्य नव्हतं. नंतर म्हणाले आलिबागला १९ बंगले आहेत. जेव्हा अलिबागला गेले तेव्हा तिथे काहीच सापडलं नाही. मग म्हणाले मुख्यमंत्र्यांनी बंगले गायब केले, असं वागणं चूक आहे.

अधिक वाचा  उज्ज्वल निकमांची जागा लोकसभा नव्हे जेलच; उमेदवारी आर.एस.एस.शी संबंधीत आरोपी वाचवला म्हणुन वादग्रस्त पोस्ट व्हायरल

एखाद्यावर खोटेनाटे आरोप करायचे, बदनामी करायची त्यामुळेच देवाची काठी कधी ना कधी पडते. ती काठी आज पडली. बीभत्स वर्तणूक विकृत वृत्ती देशाला दिसून आली, असं म्हणत आमदार वायकर यांनी किरीट सोमय्या यांचं थेटपणे सभागृहात नाव घेतलं होतं.