यवतमाळमध्ये पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात 80 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. आनंद नगर येथील हे नागरिक आहेत. हेलिकॉप्टपच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. पैनगंगेला महापुर आल्याने महागाव तालुक्यातील अनंतवाडी गावाला पुराचा वेढा बसला आणि यामध्ये 80 लोक अडकून पडले.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिदेंना कल्याण प्रतिष्ठेच्या लढतीपूर्वी झटका; मुंबईत अरविंद मोरे यांच्याकडून जरांगे फॅक्टर ‘ॲक्टिव्ह’?

याबाबत माहिती देताना वायुसेनेचे विंग कमांडर रत्नाकर सिंह म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव येथील स्थानिक प्रशासनाने विनंती केल्यानुसार MI 17 V 5 हे हेलिकॉप्टर तात्काळ महागाच्या दिशेनं उडलं आहे. 70 ते 80 लोक महागाव परिसरात अडकले असल्याची माहिती आहे. त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अडकलेल्यांची सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

बुलडाण्यात कोसळधार; काथरगावातील पुरात काही लोक अडकले

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील काही लोक पुरात अडकले आहेत. यामुळे नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हॅलिकॉप्टरची मागणी प्रशासनाने केले आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी ही माहिती दिली आहे. काथरगाव येथे नदीला महापूर आल्याने गावाला पाण्याने वेढा घातला आहे.