नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. उत्तरप्रदेशात दुसऱ्यांदा सत्ता मिळविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री होणार आहे. याबाबतच्या हालचाली राजधानी दिल्लीत सुरु आहेत. आज योगी आदित्यनाथ हे दिल्लीचा दैारा करीत आहेत. त्यांची भाजपच्या संसदीय मंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लोकसभेच्या विजयाची चावी मानल्या जाणाऱया उत्तर प्रदेशासारख्या राज्याची शक्ती त्यांच्या मागे आहे. अनेक राज्यांत मोदींनंतर योगी यांना प्रचारासाठी बोलविण्याची भाजप नेत्यांची मागणी असते. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट’ बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; OBC आरक्षणाशिवाय सोडती होणारं

योगी यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू असल्याचेही द्योतक मानले जाते. याआधी २०१३ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाजपने आधी त्यांचा संसदीय मंडळात समावेश करून नंतर त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही या मंडळात सामील करून घेण्यात आले होते.

योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित आहे. सत्तारूढ पक्षाच्या या सर्वशक्तीमान मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे. ‘सुयोग्य वेळ’आल्यावर योगी यांना भाजपच्या मातृसंस्थेकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरतील. आपल्या दिल्ली दौऱयात योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदी, संररक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या नेत्यांशी गाठीभेटी घेणार आहेत. मोदी यांना भेटल्यावर भाजपकडून त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. राजनाथसिह, शहा व गडकरी या तिघांनीही याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. भाजप संसदीय मंडळात सुषमा स्वराज, अरूण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर तीन जागा रिक्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. वर्तमान समीकरणांप्रमाणे भाजपमध्ये मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे व त्यांचाच शब्द मोदींनंतर अंतिम मानला जातो. नड्डा अधिकृत पक्षाध्यक्ष असले तरी महत्वाच्या मुद्यांवर शहा यांनाच सूत्रे हाती घेण्यास सांगितले जाते हा अनुभव आहे. मात्र शहा मोदी यांचे पंतप्रधानपदाचे वारसदार ठरणार का, हा सवाल भाजपच्या अंतर्गत वर्तुळात विचारला जातो.

अधिक वाचा  दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

शहा यांची कार्यपध्दती पडद्यामागून काम करण्याची व सूत्रे हलविण्याची आहे. त्यांचे सडेतोड बोलणेही अनेक भाजप मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेत्यांना दुखावणारे ठरले आहे. दुसरीकडे योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशासारखे राज्य भाजपने पुन्हा खेचून घेतल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा ‘ग्राफ’ चढा आहे.