पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आला. दरम्यान, या दौऱ्यानंतर केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता मोदी शहा यांच्याकडे लागले आहे. परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं. अशातच आगामी मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशातील शहडोल आणि भोपाळमध्ये जाऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजप संघटना आणि सरकारमधील बदलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि भाजप संघटनेत मोठे बदल होऊ शकतात.

अधिक वाचा  मुंबईचा गड राखण्यासाठी महायुतीचा मेगा प्लॅन, पंतप्रधान मोदी उतरणार रिंगणात

पाच राज्यांचे निवडणूक प्रभारी नियुक्त करायचे असून, काही नवे राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त करायचे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेची जबाबदारीही दिली जाईल. विरोधी महाआघाडीपेक्षा एनडीए परिवार मोठा करण्यासाठी काही मित्रपक्षांनाही सरकारमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

यात बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार तसेच अकाली दलाशी संभाव्य युती पाहता, हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचा समावेश आहे. असे अनेक बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.