मुंबई : ‘‘मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे, ’’ अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. ‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईकरांचे पैसे या सरकारने जाहिरातबाजीत घातल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. पाणी साचल्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष केले आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. त्यावर मात्र, पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याची तक्रार काय करता त्यासाठी वेळ असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल

त्याला आदित्य यांनी पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर दिले. आदित्य म्हणाले, ‘‘पावसाळ्यात मुख्यमंत्री नाल्यात उतरले आणि सफाईचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र, नालेसफाई झालीच नाही. तरीही, मुंबईच्या तक्रारींकडे मुख्यमंत्री बोट दाखवत आहेत. हा निर्लज्जपणा असून, हा प्रकार आतापर्यंत पाहिला नाही. याआधी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे सगळीकडे फिरून कामांची पाहणी करीत होते. पावसाळ्यापूर्वीची कामे करीत होते. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री रस्त्यांच्या घोटाळ्यात अडकले आहेत.

मुंबईसाठी एकही बैठक घेतली नाही

यापूर्वी मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण व्हायची. परंतु, आता नको तिथे रस्त्यांची खोदाई केली. असून, लोकांची गैरसोय होत असतानाही मिंधे गटातील काही नेता पुढे येत नाही. ठाकरे सरकार पाडण्यासाठी जेवढ्या बैठका घेतल्या, पण मुंबईकरांच्या कामासाठी एक बैठक घेतली असती, तर ही वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी शिंदे यांना काढला.

अधिक वाचा  टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत… असा आहे बीसीसीआयचा प्लान

‘आदित्य ठाकरे यांना अटक होईल’

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या केलेल्या चौकशीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे सांगून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. खोके मागितल्याचे १३ व्हीडिओ आपल्याकडे आहेत असे सांगत, आम्हाला उगाच धमक्या दिल्या तर अंगावर एक कपडाही शिल्लक ठेवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना दम भरला.