मुंबई: सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. राज्याचा बजेट आणि आपल्या घरच्या बजेटमध्ये फारसा फरक नसतो. राज्याचा बजेट व्यापक असतो एवढंच. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरातील बायकोचा पगार आणि आपला पगार, याच्यावर घरचं बजेट तयार करतो, असं सांगतानाच माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी त्यांना दिलखुलास दाद दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प: सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. २००५मध्ये ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय?’ हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी निगडीत कायदेही बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसहीत हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प कळावा या हेतूने लिहिलं आहे. पुस्तक लिहितानाच ते ४० मिनिटांत वाचून होईल, ४५ मिनिटं लागताच कामा नये, हा हेतू ठेवूनच लिहिलं, असं फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्प ही एक रचना आहे. त्याची कार्यपद्धती आणि रचना समजली की राज्याचा असो की केंद्राचा कोणताही अर्थसंकल्प समजणे सोपे जाते. तो वाचता येतो आणि त्याचे विश्लेषणही करता येते. अर्थसंकल्पात अनेकदा राजकोषीय तूट आणि वित्तीय तूट सारखे असंख्य शब्द येतात. त्यामुळे तो किचकट वाटतो. पण तसे काही नाही. आपणही आपल्या घरचा बजेट करतो. आपल्याला मिळणारा पगार किंवा पत्नीला मिळणारा पगार… माझ्या पत्नीचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तो माझ्या लक्षात राहतो… तर पती-पत्नीचा पगार ही आवक असते आणि घरखर्च ही जावक असते. त्यासाठी आपण फिस्कल मॅनेजमेंट करतो. तसंच राज्याचंही मॅनेजमेंट असतं. राज्यही उत्पन्न आणि खर्चाचं मॅनेजमेंट करतं. यात फार फरक नसतो. फक्त राज्याच्या बजेटमध्ये व्यापकता अधिक असते. राज्याला मोठं काम करावं लागतं. ते योग्यप्रकारे समजून घेतलं तर बजेटबाबतची भीती निघून जाईल, असं फडणवीस म्हणाले.
अजितदादांना त्रास देता येईल
नव्या-जुन्या सदस्यांना बजेट समजून घ्यायचा असेल तर त्यांना बजेट समजावून सांगण्याची माझी तयारी आहे. नव्या सदस्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही द्यायला मी तयार आहे. जास्तीत जास्त सदस्यांना अर्थसंकल्प समजला पाहिजे. म्हणजे अजित पवार यांना अधिकाधिक त्रास देता येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.