नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. “सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेव्हा पडत नव्हतं तेव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्राज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरं तर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो”, असं राज यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासक’राज सुरक्षारक्षकांची मनमानी सुरूच; उपअभियंत्याला गेटबाहेर ६ ते ७जणांची मारहाण

“मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल”, असंही त्यांनी म्हटलं.