जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार होता, त्या विचाराशी फारकत केली त्यामुळे आम्ही उठाव केला आहे. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, असे मत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. विधीमंडळात सोमवारी (ता. ४) मांडलेल्या विश्‍वासमताच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की आमच्यावर शिवसेनेचे बंडखोर म्हणून टिका केली जाते, परंतु आम्ही बंड केलेले नाही. आम्ही आजही शिवसैनिक आहोत, उद्याही शिवसैनिक राहणार आहोत.

बाळासाहेबाच्या विचाराने प्रेरित झालो

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, की मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या हक्कासाठी लढणारी ही शिवसेना असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण शिवसेनेत आलो. निवडणूक लढविणे त्यावेळी आमच्या विचारातही नव्हते. आमच्या बापजाद्यांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती.

अधिक वाचा  आरटीईचा घोळ अखेर संपला, उद्यापासून अर्ज भरलेल्या पालकांनीही नव्याने अर्ज भरावा लागणार, हा केला बदल

बंड नव्हेच आमचा उठाव

बंडखोर म्हणून होणाऱ्या टिकेवर पाटील म्हणाले, की आमच्यावर बंडखोर म्हणून टिका केली जाते, आम्ही कुठे बंड केले आहे, आम्ही जिथे होतो तिथेच आलो आहोत. आमचा हा उठाव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा नारा दिला होता. त्या विचारांशी फारकत घेवून शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी आघाडी केल्यामुळे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी उठाव केला आहे.

आम्ही आजही शिवसेनेतच

शिवसेना सोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, आम्ही आमच्या मतदार संघातील शिवसेनेच्या भरवशावर येथे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा भगवा आम्ही कायम खाद्यांवर घेणार आहोत.