शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आला. या निकालाने राजकीय गोंधळ आणखी वाढल्याची चित्र आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. आता याच निकालाने ठाकरेंच्या आमदारांची कोंडी झाली आहे. कारण या आमदारांना शिदेंच्या आदेशाचे पालन करावं लागणार आहे, ते केले नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल. हे विधानसभा अध्यक्षांनीच आता स्पष्ट केलं आहे. याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे अधिकृत प्रतोद म्हणून भरत गोगावलेंच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. निकाला देताना अध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की, शिवसेनेत फूट नाही, तर नेतृत्वावरून वाद निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे इथे १०वे परिशिष्ट लागू होत नाही. त्याचबरोबर बहुमताच्या आधारावर निकाल देताना खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका

शिंदेंचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांना पाळावा लागणार!
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत फूट पडली आहे आणि दोन गट निर्माण झाले आहे, हे मान्य केलेले नाही. याबद्दल बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, “हा पक्षातंर्गत कलह आहे. विधानसभेत माझ्यापुढे एकच शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदारांना भरत गोगावलेंचे निर्देश पाळावेच लागतील.”

अध्यक्षांनी एकच शिवसेना असल्याचे स्पष्ट केल्याने एकनाथ शिंदेंचे आदेश पाळणे ठाकरेंच्या आमदारांवर बंधनकारक असणार आहे. भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांनी पाळला नाही, तर त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोर जावे लागेल. त्यामुळे आमदारकी जाण्याची टांगती तलवार ठाकरेंच्या आमदारांवर कायम आहे.

अधिक वाचा  मुंबईत दोन्ही ठाकरेंचा आमने सामने एल्गार “मोदीराज” अन् इंडिया फ्रंट सभांमुळे शिवतीर्थ अन् बीकेसीकडे नजरा

ठाकरेंच्या आमदारांना सत्ताधारी बसावे लागेल?
विधानसभेत आणि विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार विरोधी बाकांवर बसतात. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सत्ताधारी बाकांवर बसतात. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना सत्ताधारी बाकांवर बसावे लागणार आहे. कारण अध्यक्षांनी ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे, हे मान्यच केलेले नाही. राहुल नार्वेकरांनीही ते स्पष्ट केले आहे, ते म्हणालेत की, “ते विरोधात आहेत, पण त्यांना सत्ताधारी बाकांवर बसावं लागेल.” त्यामुळे आता ठाकरे गटासमोर सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल हेही महत्त्वाचे असणार आहे.

अधिक वाचा  घाटकोपर होर्डींग अन् पेट्रोल पंप सर्वच अनधिकृत! अशी ‘लिम्का बुक’मध्ये नोंद: मात्र व्यवस्थेने असे झटकले हात…

आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत -अनिल परब
दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदेंचे प्रतोद भरत गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. असं असलं, तरी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला मान्यता दिली आहे. मशाल निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यामुळे हा स्वतंत्र पक्ष असल्याचे सिद्ध होते. आम्हाला अन्य कोणाचाही पक्षादेश लागू होण्याचा प्रश्न नाही”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली आहे.