मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून दोन महिन्यांच्या जामीनावर सुटका झाली असून त्यासंबंधी मुंबई सत्र न्यायालयात जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर नवाब मलिकांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केली होती. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.

प्रकृतीच्या कारणास्तव पुढील दोन महिन्यांसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांची तब्बल एक वर्ष पाच महिन्यांनी जेलमधून सुटका झाली आहे. नवाब मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होते. मलिकांच्या सुटकेची बातमी कळताच त्यांचे कार्यकर्ते रुग्णालय परिसरात जमले होते. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेदेखील मलिकांच्या सुटका झाल्यानंतर रुग्णालयात भेटीसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी मलिकांच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून सुटकेचा जल्लोष केला.

अधिक वाचा  भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा ‘तो’ सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण

जामीनासाठी या आहेत अटीशर्थी

सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याबाबत सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयानं 50 हजार रुपयांचा जामीन, साक्षीदारांना धमकावू नये, घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्यावा, पासपोर्ट जमा करावा, मीडियाशी बोलू नये आणि गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये अशा अटीशर्थींवर मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला.

थोरले पवार की, धाकटे पवार? नवाब मलिक कोणाची साथ देणार?

राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानंतर नवाब मलिकांना जामीन मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नवाब मलिकांच्या मुलीने आणि त्यांचे बंधू कप्तान मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. अशातच आता नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.