रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडीतील दृश्य बघून अवघ्या महाराष्ट्राचे डोळे डबडबलेत. कुणाच वडील, कुणाचा मुलगा, कुणाची आई, तर कुणाचं संपूर्ण कुटुंबच भल्यामोठ्या दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान रात्रीपासून झटत असून, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच आहेत. पावसांचं थैमान अन् कुठलीही मशिनरी नेणे अशक्य असल्याने अडचणीचा सामना करत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिथे सायकलीही जात नाही, अशा इर्शाळवाडीतील मदतीला वेग देण्यासाठी आता सरकारने हेलिकॉप्टरने जेसीबी मशिन घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं की, 25 ते 28 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. सुरूवातीला 21 जखमींपैकी 17 जणांना त्याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये उपचार करण्यात आले. तर 6 जणांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 10.15 वाजेपर्यंत या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मदत मोहीम सुरू आहेत आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या म्हणजे 60 जवान बचाव कार्यात लागलेले आहेत.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिदेंना कल्याण प्रतिष्ठेच्या लढतीपूर्वी झटका; मुंबईत अरविंद मोरे यांच्याकडून जरांगे फॅक्टर ‘ॲक्टिव्ह’?

सांताक्रूझ विमानतळावर दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. मात्र, वातावरण खराब असल्याने हे हेलिकॉप्टर्स उड्डाण करू शकले नाहीत. तात्पुरते हेलिपॅड ज्या ठिकाणी दुर्घटना झाली आहे, तिथे तयार करण्यात आले आहेत.

जेसीबी घेऊन जाण्याचे प्रयत्न
1.2 टन वजनाचे दोन जेसीबी हवाई मार्गे घेऊन जाता येतील का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मदत कार्यासाठी जी आवश्यक मशिनरी आहे, तीही हवाई मार्गे नेता येतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सगळ्या मशिनरी सांताक्रूझ विमानतळावर नेण्यात आल्या आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या तेथे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार महेश बालदी हे मध्यरात्रीच पोहोचले. ते दोघेही स्वतः मदत कार्यात आहेत. पाऊस आणि हवामानामुळे मदत कार्यात अडचणी असल्या त्यातून मार्ग काढला जात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

अधिक वाचा  मुंबईचा गड राखण्यासाठी महायुतीचा मेगा प्लॅन, पंतप्रधान मोदी उतरणार रिंगणात

सिडकोचे 500 कर्मचारी घटनास्थळी
गेल्या 3 दिवसात सुमारे 499 मिमी पाऊस येथे झाला आहे. एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे, असं फडणवीसांनी सभागृहाला सांगितलं.