महाविकास आघाडीची शिल्लक राहिलेली वज्रमूठही ढिली झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उपस्थित नसल्यानं विरोधकांच्या आंदोलनातली हवाच निघाली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच बरसले. सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली, मात्र या निमित्तानं विरोधकांमध्ये एकी नसल्याचंही दिसून आलं.

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आंदोलनात सहभागी झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा एकही आमदार सरकारच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाला नाही. तसंच सभागृहातही अजित पवार बोलायला उभे राहिल्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली, त्याहीवेळी शरद पवार गटाचे आमदार शांतच होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना विरोधकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अधिक वाचा  हे तीर्थस्थानी फेअरवेल तर मोक्ष मिळतो; राजकारणातून संपलेला अध्याय संजय राऊतांची मोदींवर खोचक टीका

विधानसभेतही नाना पटोले आक्रमकपणे भूमिका मांडत असताना शरद पवार गटाचे आमदार घोषणाबाजीत सहभागी झाले नव्हते. या सर्व घडामोडींवरून विरोधकांमध्ये ऐक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानं सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोले लगावले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके विस्कळीत विरोधक असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट 2 जुलै रोजी अजित पवारांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाला. तर शरद पवार गट महाविकास आघाडीत असल्यानं त्यांचे आमदार आंदोलनात सहभागी होणं अपेक्षित होतं, मात्र शरद पवार गटाचे आमदार आंदोलनात उतरले नाहीत, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.