मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व खासदार कृपाल तुमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. महाविकास आघाडी सरकारात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना आर्थिक गैरव्यवहार करत होते, असा आरोप खासदार तुमानेंनी केला होता, यावर आता अजित पवार यांनी तुमानेंना प्रत्युत्तर देत त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

आजच्या पत्रकारपरिषेदेत अजित पवार यांना तुमानेंनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया विचारले असता अजित पवार आक्रमक होत, त्यांचा खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील एका व्यक्तीने जरी सांगितलं ना, मी राजकारण सोडेन. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावं. त्यांनी जर सिद्ध करून नाही दाखवलं तर खासदार तुमानेंनी घरी बसावं. हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. तुम्ही खासगीत आमदारांना पण विचारा माझ्या कामाची पद्धत कशी होती. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला,” असा जोरदार समाचार अजित पवारांनी घेतला.

अधिक वाचा  “ये नकली संतान…”; आंध्रप्रदेशातून पंतप्रधान मोदींची ठाकरेंवर बोचरी टीका, शरद पवारांवरही साधला निशाणा

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून टोला :

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही, करायचा तर कधी करायचा याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. कदाचित वीस जणांचे छोटे मंत्रिमंडळ त्यांना पुरेसे वाटत असेल, महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न देणे त्यांना योग्य वाटत असावे, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.