राज्यातील नागरिकांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केरळ सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. विजयन यांच्या सरकारने स्वतःची इंटरनेट सेवा लाँच केली आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (K-FON) असं नाव याला देण्यात आलं आहे. स्वतःची इंटरनेट सेवा उपलब्ध असणारं केरळ हे देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की के-फोनचे (KFON) लोकार्पण ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. राज्यातील 20 लाख कुटुंबांना या माध्यमातून मोफत इंटरनेट देण्यात येणार आहे. यामुळे लोकांमध्ये असलेले डिजिटल विभाजन संपुष्टात येणार आहे.
पूर्ण केरळमध्ये हायस्पीड नेट
के-फॉनमुळे पूर्ण केरळमध्ये हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये उच्च स्पीड आणि चांगली क्वालिटी पुरवण्यात येईल, अशी ग्वाही विजयन यांनी यावेळी दिली.
कोणाला मिळणार मोफत नेट?
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या 20 लाख कुटुंबांना या माध्यमातून मोफत इंटरनेट देण्यात येणार आहे. यासाठी मल्टी-सिस्टीम ऑपरेटर्स, इंटरनेट प्रोव्हाईडर्स आणि टीएसपी यांच्यासोबत राज्य सरकारने पार्टनरशिप केली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात 14 हजार कुटुंबांना ही सेवा देण्यात येणार आहे. या माध्यमातून केरळमधील 17 हजारांहून अधिक सरकारी कार्यालयात आधीपासून मोफत इंटरनेट कनेक्शन देण्यात आलं आहे. तसंच, राज्य सचिवालय आणि 10 जिल्हा कलेक्ट्रेट देखील आधीपासून याचा वापर करत आहेत.
स्वस्त असणार पॅक
हाय स्पीड पॅकसाठी, तसंच ज्यांना ही सेवा मोफत मिळणार नाही त्यांच्यासाठी अगदी कमी किंमतीत इंटरनेट उपलब्ध करण्यात आलं आहे. याचा बेसिक प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये 20 Mbps स्पीड आणि 3,000 जीबी डेटा मिळेल. तर, सर्वात महागडा प्लॅन 1,249 रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये 250 Mbps स्पीड आणि 5,000 जीबी डेटा मिळेल. या किंमती जीएसटी वगळून आहेत.