हैदराबाद : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनाच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुसरीकडे हैदराबाद खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना या कार्यक्रमासाठी भाजपकडून आमंत्रित करण्यात आलंय. यापूर्वी, ओवैसी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान मोदी संविधानिक पदाच्या शपथेचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं होतं.

उल्लेखनीय म्हणजे, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून करण्यात आलंय. सगळ्या नेत्यांना याच ट्रस्ट मार्फत निमंत्रण धाडण्यात आलंय. मात्र, तेलंगणा भाजपचे नेते आणि मुख्य प्रवक्ते कृष्णा सागर राव यांच्याकडून भूमिपूजन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलंय.

अधिक वाचा  निवडणुकीच्या धामधुमीत राज्याला मोठा धक्का ; शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला

‘आमच्या कार्यकाळात कोटी हिंदुंचं स्वप्न साकार होणार आहे’ असं राव यांनी म्हटलंय. डाव्यांना तसंच एआयएमआयएम सारख्या पक्षांच्या विरोधाला त्यांनी तुच्छ लेखत ‘अशा पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचीही गरज नाही’ असं म्हणत त्यांना उडवून लावलंय. भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतं, असंही त्यांनी म्हटलंय.

राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपण यावर आक्षेप घेणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना आणि असदुद्दीन ओवैसी सारख्या लोकांना आमंत्रित करत असल्याचं कृष्णा सागर राव यांनी म्हटलंय. ५ ऑगस्ट रोजी होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम जवळपास ४० मिनिटांचा असेल. ५ ऑगस्ट रोजी ९ ब्राह्मण पंतप्रधान मोदींकडून प्रत्यक्ष पूजा करवून घेतील. या दरम्यान सर्व २१ ब्राह्मण उपस्थित राहतील. भूमिपूजनासाठी देशातील संतांना, नेत्यांना आणि राम मंदिर आंदोलनाशी निगडीत जवळपास १७५ जणांना ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासक’राज सुरक्षारक्षकांची मनमानी सुरूच; उपअभियंत्याला गेटबाहेर ६ ते ७जणांची मारहाण

उल्लेखनीय म्हणजे, राम मंदिर आंदोलनात सक्रीय भूमिका घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मात्र अयोध्येला जाणार नाही. दोन्हीही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.