पुणे: वाढते शहरीकरण, बांधकाम प्रकल्प आणि वाहनांच्या धुरामुळे वायू प्रदूषण वाढले असून वर्षातील पाच महिने पुण्याची हवा रोगट असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे पहिल्या दहा क्रमांकात आले आहे.
‘एक्यूआय एअर व्हिज्युअल’ या स्विस संस्थेने जगभरातील तीन हजार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. यामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पुणे २९९ व्या क्रमांकावर आले आहे.
हवेच्या गुणवत्तेनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने उत्तम, समाधानकारक, आजारी माणसांसाठी धोकादायक, रोगट आणि श्वसनास अतिधोकादायक आणि विषारी हवा असे निकष निश्चित केले आहेत. या मानकांनुसार पुणे शहरामध्ये एकही महिना उत्तम श्रेणीतील हवेची गुणवत्ता आढळून आलेली नाही.
पुण्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर या दोन महिन्यांत गेल्या वर्षी सर्वाधिक प्रदूषण नोंदविण्यात आले; तर फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर या महिन्यात रोगट हवा होती. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात समाधानकारक (मॉडरेट) श्रेणीतील हवेची गुणवत्ता नोंदविण्यात आली. बांधकाम प्रकल्प, वृक्षतोड, विकासकामे आणि वाहतुकीमुळे हवेतील सूक्ष्म, अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे श्वसनाचे आजार वाढले असून लहानांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत, असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
आकडे बोलतात…
पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदूषणात घट
गेल्या वर्षी सरासरी पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) २.५चे प्रमाण ४६.३ मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर होते. या वर्षी त्यात घट होऊन ३५.७ (मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर)नोंद झाली.
शहरात जानेवारी आणि डिसेंबर हे सर्वाधिक प्रदूषित महिने
फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर महिने या काळात रोगट वातावरण
उर्वरित महिने समाधानकारक
एकही महिना उत्तम नाही
पुण्यावर एक नजर
जगभरातील प्रदूषित शहरात पुण्याचा क्रमांक ३०० देशात पुण्याचा ७४ वा क्रमांक लागतो. राज्यात नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असून नागपूर दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याचा क्रमांक आठवा आहे.