मुंबई : नवी मुंबई, खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्ररकणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आतापर्यंत करण्यात आली होती. मात्र आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ही मागणी केली आहे. ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार रविवारी मिळाला. या सोहळ्यात उपस्थित अनेक श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झालाय. यामुळे आपण व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली होती.

अधिक वाचा  वक्फ सुधारणा कायद्या या तरतुदींना ‘स्थगिती’चा सर्वाेच्च विचार; ७२ याचिकांवर सुनावणी गुरुवारीही पुन्हा सुनावणी होणार

काय म्हणाले सचिन खरात?
सचिन खरात म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यंदा जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की, ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे.

त्यावेळेस अभिनेते निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही.. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही.. उलट अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा.

अधिक वाचा  टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

काँग्रेस-शिवसेना आक्रमक
दरम्यान, खारघर येथील कार्यक्रमात मृत पावलेल्या श्री सदस्यांचा आकडा लपवला जातोय. सरकारने १३ जणांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय. हा आकडा जास्त असू शकतो, असा आरोप शिवसेनेने केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ज्या मंत्रालयामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या सांस्कृतिक मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना तसेच काँग्रेसने केली आहे. या प्रकरणात विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली. मात्र त्या दिवशी प्रचंड उष्ण तापमान असल्याने अनेक नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागला. यापैकी काहींचा मृत्यू झाला. कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली, मात्र कारण उष्माघाताचं सांगण्यात आलं, असा आरोपही विरोधकांनी केलाय.

अधिक वाचा  स्वत:च्या प्रॉपर्टीतून वाटताय का निधी? संतापलेल्या कोल्हेंनी अजितदादांना दिलं आव्हान…