अजित पवार गेल्या काही दिवसांपासून भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचं खंडन अजित पवारांनी केलं असलं तर या चर्चेमुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले का? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेवर खुद्द अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहाता, यामागे राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य फुटीवरून गेल्या आठवडाभर अजित पवार चर्चेत होते.
अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांमुळे एकीकडे महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ झाले होते. कारण अजित पवारांसारखा धडाकेबाज नेता सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्यास महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतरच्या राजकारणावर नजर टाकल्यास उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभेचं आयोजन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. या दोन्ही सभेत उद्धव ठाकरेंनी सर्वात शेवटी भाषण केलं, त्यामुळे मविआचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे सगळा फोकस अजित पवारांकडे वळला. मविआच काय पण सत्तधारी नेत्यांनी त्यावर भाष्य केलं.
राज्यातील राजकीय चर्चेचा फोकस अजित पवारांवर शिफ्ट झाल्यामुळे महाविकास आघाडीतील त्यांचं राजकीय महत्व आणखी वाढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना? अशीही चर्चा रंगलीय. कारण भाजपला अजित पवारांची साथ मिळाल्यास सत्ताधारी शिवसेनेचं राजकीय महत्व आपोआप कमी होणार असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय, त्यामुळेच अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पोटात गोळा आला नाही तरचं नवलं.