राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यानिमित्ताने सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरु आहे. अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून सर्वच राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यातच आता अजित पवारांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी आपल्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी विनंतीच केली आहे. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचं काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

“माझ्याबद्दल सातत्याने ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून, पक्षातच राहणार आहोत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. वेगवेगळ्या चॅनेलवर इतर राजकीय पक्षांचे नेते त्यांची मतं व्यक्त करत आहेत, तो त्यांचा आधिकार आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वेगवेगळ्या विविध पातळींवरुन कारवाई; ‘या’ शिफारशींमुळे रुग्णालय मोठ्या अडचणीत

“मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसात बसलेलो असतो. मंगळवार, बुधवार आमदारांच्या कमिटी मीटिंग असतात. अनेक आमदार मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. आजही मी येथे असल्याने आमदार भेटायला आले होते. त्यातून वेगळा अर्थ काढण्याचा गरज नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. जे आमदार भेटल्याचं दाखवलं जात आहे, त्यांच्याबद्दल उगाच आमचा कणा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. त्यांनी काळजी करु नये असं सांगायचं आहे. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. सध्या महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी हे केलं जात आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

अधिक वाचा  मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

पुढे ते म्हणाले की “कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. उगाच अंदाज व्यक्त केले जात आहेत. काहीजणांना तर मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का असं सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा सरकारबद्दल काय निकाल लागायचा तो लागेल. मी सभेत बोललो नाही याची बातमी झाली. पण बाळासाहेब थोरातही बोलले नव्हते, पण त्याची बातमी झाली नाही. आम्हीच प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील असंच ठरवलं होतं”.

“माझ्या ट्विटमधून मी काहीच हटवलेलं नाही. पण त्यातूनही गैरसमज निर्माण केले जात आहेत. उगाच ‘ध’चा मा करु नये. काही झालं तर असेल तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाचीही गरज नाही. पण कोणतीही चर्चा नसताना उगाच बातम्या पेरल्या गेल्या. माझ्या पक्षात आकस असणारं कोणी नाही. पण काही पक्षाचे प्रवक्ते तर आमचे प्रवक्ते असल्यासारखंच बोलू लागले आहेत. त्यांना कोणी अधिकार दिला? पक्षाच्या बैठकीत मी याबद्दल विचारणार आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली. आमचं वकिलपत्र कोणी घेण्याची गरज नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा साधला. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांकडून मंत्री अतुल सावे यांना झटका, आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मंजूर कामांना स्थगिती