तिन्ही घटक पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अर्थात शिवसेना, या तिघांची आघाडी मजबूत आहे. या आघाडीची भीती भाजपला वाटते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे भाजप या अफवा आणि वावड्या उठवतोय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर राऊत बोलत होते. अजित पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, तिन्ही घटक पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अर्थात शिवसेना, या तिघांची आघाडी मजबूत आहे. या आघाडीची भीती भाजपला वाटते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून 2024पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचं त्यांचं कारस्थान नक्की आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील… वीस पंचवीस आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं, असं होत नाही. नक्कीच मीही म्हणतोय, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नावांशी बांधलेली आहे. बातम्या येतात, 40 फुटले, 50 फुटले, 100 फुटले. अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे, मी तुम्हाला दाव्याने सांगतो. अजितदादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होताहेत, माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत. भाजप या अफवा आणि वावड्या उठवतोय. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करताहेत. आपापसाहेत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत, पण तसं काहीही होणार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना ‘या’ तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा!

या प्रश्नाचं उत्तर देताना राऊत यांनी सत्ताधारी मिंधे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, या बातम्यांमुळे सगळ्यात जास्त पोटात गोळा आला असेल तो मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाच्या. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण, अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत, प्रमुख नेते आहेत आणि त्यांचं राजकीय भविष्य हे महाविकास आघाडीतूनच पुन्हा एकदा शिखरावर जाणार आहे, हे मला माहीत आहे. त्यांच्याविषयी या बातम्या, वावड्या आणि रेवड्या उठवल्या जात आहेत, त्याचा महाविकास आघाडीच्या एकीवर आणि मजबुतीवर काहीही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. हे तुम्ही आकडे सांगताय, हे आकडे कुठून येतात ते माहीत नाही. एकाच वृत्तपत्राला हे आकडे कसे मिळतात? पण येऊ द्या, काही हरकत नाही. लोकं एन्जॉय करतात, असं राऊत यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीसंबंध केलेल्या विधानावर राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, त्यांनी लोकसभेच्या 45+ नाही तर 10 मिळवल्या तरी भरपूर आहे. या महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे, ते किमान विधानसभेतल्या 185 जागा जिंकणार, तुम्ही कितीही फोडाफोडी करा. तुम्ही आमदार फोडा, खासदार फोडा पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीशी आहे. हे चित्र आपण पाहाताय. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा असतील किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील. लोकांची चीड आणि संताप दिसतोय. आणि याचाच धसका जर भाजपने घेतला असेल तर त्यातून या अफवा, वावड्या, रेवड्या उडवल्या जात आहेत. उडवू द्या. मिशन लोटसवरून विचारेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, त्यांची भरती ही बिनपगारी असेल. अलिकडे काँट्रॅक्ट लेबरची भर्ती फार होते, जर कुणी काँट्रॅक्ट लेबर म्हणून कुणी घेणार तर त्यांनी घ्यावं ना. त्यांचं वॉशिंग मशीन आता परत रिपेअर करायची वेळ आली आहे. इतक्यावेळा धुऊन झालं आहे. आता यांना सगळ्या भाजपच्या लोकांना त्यांच्याच मशिनमध्ये टाकावं लागेल.

सर्वोच्च न्यायालयातील लढ्याविषयीच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल त्यांच्याविरोधात येण्याची फक्त शक्यता नाही, तर मला खात्री आहे. हे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील याची मला खात्री आहे. हा देश संविधान, कायदा, नियम यानुसार चालतो असं मी मानतो. भले केंद्रातील काही लोकं, सत्ताधारी यंत्रणांवर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घेत असतील, पण अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेत रामशास्त्री आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे, निकाल आणि न्याय यामध्ये फरक आहे. आम्हाला न्याय मिळेल. कदाचित त्या वृत्तपत्राने 40 जणांचं स्वतःच पत्र तयार केलं असेल, मला माहीत नाही. पण, मी म्हणतो या वावड्या आहेत, यात काहीही तथ्य नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरोदर महिला मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच मोठ पाऊल; उद्या पुढची दिशा निश्चित

के. सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले की, के. सी. वेणुगोपाल हे काँग्रसचे ज्येष्ठ नेते आहेत, महासचिव आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष दूत म्हणून ते मातोश्रीवर आले. त्यांचे काही महत्त्वाचे राजकीय निरोप होते, त्यावर त्यांनी तासभर चर्चा केली. चर्चा चांगल्या वातावरणात झाली. त्यात काही भविष्यातील घडामोडींसंदर्भात निकाल घेतले गेले. आणि पुन्हा एकदा लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल, अशा प्रकारचा निर्णय झाला, अशी माहिती राऊत यांनी दिली.