राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. ही चर्चा रंगली असताना याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांबरोबर सध्या 15 च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. असं असताना यावर आता अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे. हे वृत्त फेटाळलं आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे. अजित पवार विधानभवन परिसरात रवाना झाले असून तिथे ते काही आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.