राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राजकीय वर्तुळातून आणखी एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडणार आहे. राष्ट्रवादीला येत्या काहीच दिवसात खिंडार पडणार आहे. मात्र, पक्षांतर करणारा हा गट अजित पवार यांचा नसून अनेक वरिष्ठ नेत्यांचा आहे. हे नेते पक्षांतर करणार आहेत. यामध्ये मंत्रिपदे भोगलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
गेले काही काळ वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे १० जण भाजपच्या मार्गावर आहेत. हे सगळे ज्येष्ठ नेते असून महत्वाची खाती सांभाळलेले बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत, असे वृत सूत्रांच्या हवाल्याने दिले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ”खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.”
सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ‘जिथे दादा तिथे मी’ असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्वांना माहिती आहे की मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. ते उद्या जो निर्णय घेतील तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे.” असे बनसोडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चर्चा होत आहे.
“अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना साथ दिली याचा आनंद आहे. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, हे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे मी जे केले ते योग्यच होते.” असेही बनसोडे म्हणाले.