नवी मुंबईतल्या खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण करु नका’, अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आप्पासाहेबांनी परिपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे सांगितले की, ‘महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे.

अधिक वाचा  बीडमध्ये चाललंय काय? महिला वकिलाला सरपंचासह इतरांची पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण, अंग काळंनिळं पडलं

‘माझ्या कुटूंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत.’, असे आप्पासाहेबांनी यावेळी सांगितले.

तसंच, ‘या घटनेतील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.’ असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या घटनेचे राजकारण करु नका अशी विनंती केली आहे.

अधिक वाचा  अनुराग कश्यप का भडकला, म्हणाला… भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’

दरम्यान, नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला आप्पासाहेबांच्या श्री सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. भर उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे अनेक श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघातामुळे आतापर्यंत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक श्री सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.