इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा इंदापूर तालुक्यातील शेळगावचे सुपुत्र यशवंत विठ्ठल माने यांची इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज राहिल्याने माने हे बिनविरोध संचालक झाले आहेत. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. अर्ज छाननीनंतर १८ जागांसाठी १४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर येत्या २० एप्रिल रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, माने यांच्या बिनविरोध निवडीने इंदापूर बाजार समितीत राष्ट्रवादीने आपल्या विजयाचे खाते उघडले आहे.
या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व ज्येष्ठ नेते अशोक घोगरे तसेच डॉ शशिकांत तरंगे यांच्यासह अन्य गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार आहे, हे २० तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरले आणि दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत, त्यामुळे आमदार माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
मागील काळात शेतकरीहिताचे निर्णय घेतले : माने
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडीबाबत आमदार यशवंत माने म्हणाले की, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळात उपसभापती म्हणून काम करत असताना मोहोळची आमदारकी मिळाली. बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांत शेतकरी व व्यापारी वर्गासाठी संचालक मंडळाच्या मदतीने हिताचे निर्णय घेतले. पुन्हा पाच वर्षांसाठी मला बिनविरोध संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल सर्व शेतकरी, व्यापारी मतदार, तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, डॉ. शशिकांत तरंगे यांचेसह सर्व मतदारांचे आभार मानतो.