नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची भेट घेतली. तीनही नेत्यांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक

अमित शाहांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. 24 जणांवर कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवळपास 300 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.

अधिक वाचा  मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

नवी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात काही श्री सदस्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याचे समजले. हे वृत्त अतिशय दुःखद, वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची विचारपूस केली.

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

दरम्यान सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक श्री सदस्य गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

अधिक वाचा  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर

कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास, अकरा जणांचा मृत्यू

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.