मुंबई : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तांतर झालं. शिवसेनेत उभी फुट पडली आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद जाऊन एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र या सत्तांतरानंतरही राज्यातील स्थिती अस्थिर असून महाराष्ट्रातील जनतेला राजकीय भूकंपाचा नवा अंक अनुभवण्यास मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यावेळी राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू शकतो, असं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतल्याची चर्चा आहे. तसंच अमित शहा यांनी काल झालेल्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादीतील एका गटाला सत्तेत सामावून घेण्याबाबत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.

खरंतर अमित शहा हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. मात्र रविवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा असताना शहा हे शनिवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेत नव्या राजकीय समीकरणांची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी शहा यांनी हालचाली सुरू केल्या असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

अख्खी राष्ट्रवादीच भाजपला पाठिंबा देणार की पक्षात फूट होणार?

आमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांवर पक्षांतरासाठी दबाव असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कबुल केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा एक गट फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून फुटणाऱ्या गटात कोण कोण असेल, त्याचे नेतृत्व कोण करेल तसेच त्याला सत्तेतील वाटा कशाप्रकारे देता येईल याची चाचपणी अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केल्याची माहिती आहे.

भाजपला का हवी राष्ट्रवादीची साथ?
शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर महाविकास आघाडीची ताकद क्षीण झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र अशा स्थितीतही भाजपला आता राष्ट्रवादीची किंवा तेथील एका गटाची साथ का हवी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र त्याचं कारण आहे आगामी लोकसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीने निर्माण केलेलं आव्हान. लोकसभा निवडणुकांना जेमतेम वर्षच उरल्याने त्यादृष्टीने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यातील ३५ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. केंद्रातही शिवसेना भाजपसोबत असल्याने त्यांच्या खासदारांचा पाठिंबा होता. मात्र, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत नसल्याने त्यांच्याशिवाय राज्यात पुन्हा तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणणे हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे आणि राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी बनली असून त्यांनी या आव्हानामध्ये अधिक भर घातली आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी कोणत्याही परिस्थितीत भाजपला फोडायची असून त्यासाठीच राष्ट्रवादीमधील आमदारांचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वत: अमित शहा यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी आवश्यक ती सर्व बोलणी त्यांनी केल्याचे समजते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मात्र यासंबंधीची कोणतीच कल्पना भाजपकडून देण्यात आली नसल्याचंही समजते.

अधिक वाचा  अनुराग कश्यप का भडकला, म्हणाला… भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’

दरम्यान, एकीकडे भाजपकडून या हालचाली सुरू असताना मी अमित शहा यांची भेट घेतली नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात खरंच राजकीय भूकंप होणार का आणि असा भूकंप झालाच तर त्याचे स्वरुप नेमके कसे असणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.