ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. मात्र, या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला असून 8 जणांवर मृत्यू ओढवला आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्याने काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. उष्माघाताचा त्रास होऊ लागताच अनेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यवस्थ झालेल्यांची चौकशी केली.

अधिक वाचा  बीडमध्ये चाललंय काय? महिला वकिलाला सरपंचासह इतरांची पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण, अंग काळंनिळं पडलं

कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती.

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती. खारघर येथील भव्य मैदानात झालेल्या या भव्य कार्यक्रमाला लाखो धर्माधिकारी समर्थक पोहोचले होते. या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच लोकांची ये-जा सुरू झाली होती आणि सकाळी 11.30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम एक वाजेपर्यंत चालला. यातील अनेक जण शनिवारीच आले होते.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा