सासवड : ‘‘पुरंदर तालुक्यात राष्ट्रीय जल जीवन मिशनमधून ‘हर घर नल’ योजनेसाठी भाजपमार्फत सन २०२१-२२ मध्ये ३५० कोटी रुपये मंजूर करून कामेही प्रगतिपथावर आहेत. तर, ‘जल जीवन मिशन’मधूनच सन २०२२-२३ साठी १५० कोटी रुपये पुन्हा मंजूर केले आहेत. तर, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेकरिता दुरुस्तीकरिता अगोदर ६७ कोटी रुपयांचा निधी दिला. पुन्हा याच उपसा सिंचन योजनेकरिता ४६० कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. त्यामुळे भाजप व शिवसेना महायुती सरकारच्या कामाचे कोणी फुकटचे श्रेय घेऊ नये,’’ असे पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी स्पष्ट केले. सासवड (ता. पुरंदर) येथील भाजप कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यानंतर बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे, सासवड शहर भाजप अध्यक्ष साकेत जगताप, नीलेश जगताप यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महायुती सरकार पुरंदर-हवेलीमध्ये
भरपूर विकास कामे मंजूर करून निधी देत आहे. यापूर्वी आम्ही श्रेय घेण्याच्या फंदात पडत नव्हतो. पण, दुसरेच कोणी श्रेय घेत असतील, तर आम्ही त्यावर आता आक्षेप घेत आमच्या पक्षाने व आमच्या सरकारने केलेली कामे ठणकावून सांगणार. पुरंदरमधील पालखी महामार्गासाठी पूर्वीही २५० कोटी रुपये दिले. जिल्हा नियोजन मंडळातून विविध विकास कामासाठी १० कोटी रुपये दिले होते. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप व शिवसेना महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या शिफारशीने ३३ कोटी रुपये विविध विकास कामांसाठी पुन्हा दिले.’’

अधिक वाचा  मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

जगदाळे म्हणाले, ‘‘जेजुरी शहरातील विविध विकास कामांसाठी पहिले ५० लाख रुपये दिले. आता ६.५० कोटी रुपये दिले. जेजुरी देवस्थानच्या विकास आराखड्यासाठी ११० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. शेतकरी पेन्शन योजनेकरिता दर दोन महिन्याला ५ कोटी रुपये दिले जातात. केवळ पुरंदर तालुक्यात आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड १७ हजार नागरीकांना उपलब्ध करून दिले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच महायुती सरकारने उपसा जलसिंचन योजनेचे कमी केलेले वीजबिल पुन्हा वाढविले होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार येताच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व भाजप नेत्यांनी मुद्दा लावून धरताच पुन्हा केवळ १९ टक्के वीजबिल करण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी घेतला. याचे श्रेय इतर कोणीही घेऊ नये.’’

अधिक वाचा  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर

जालिंदर कामठे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीला निधी भरभरून दिला. मग सत्तेतील आमदार पुरंदरचा असतानाही पुरंदरला निधी का दिला नाही? खासदारकीला पुरंदर-हवेलीची मते चालतात, मग आम्हालाही निधी चालला असता की. महायुती आता न्याय देत आहे. त्यामुळे विजय शिवतारे व आम्ही सोबत काम करणार आहोत.’’सासवड शहरात विविध रस्ते, पूल, पेव्हींग ब्लॉक टाकणे आदी विकास कामांसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नातून १.५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री पाटील यांनी मंजूर केला आहे. सासवड शहरात सुरू असलेल्या बंदिस्त गटर योजनेला ५८ कोटी रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचीही आठवण ठेवा.

अधिक वाचा  कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

– साकेत जगताप, अध्यक्ष, सासवड शहर भाजप