अतिक अहमदच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ज्यावेळी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफची हत्या करण्यात आली, तेव्हा पोलीस त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. अतिक आणि अशरफला जेव्हा गोळी मारली गेली, तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना प्रश्न विचारत होते, ते उत्तर देणार, तेवढ्यात त्यांना गोळी मारण्यात आली.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मारेकरी हे माध्यमकर्मी म्हणून तिथे आले होते. त्यांनी आपल्या गळ्यात आयकार्डही घातलं होतं. त्यांनी अनेक गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर जय श्रीरामचे नारेही दिले. मात्र यानंतर लगेचच दोन्ही हात वर करत सरेंडरही केलं.
पोलिसांनी गोळ्या झाडणाऱ्या तिघांनाही अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तीन पिस्तुल, एक मोटर सायकल, एक व्हिडीओ कॅमेरा आणि न्यूज चॅनेलचा एक लोगो पडलेला आढळला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या अशा हत्येने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह हटवण्यात आले आहे. या दोघांनाही २००५ च्या उमेश पाल हत्याकांड प्रकरणात सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. झाशी इथं १३ एप्रिल रोजी अतिकचा मुलगा असद आणि त्याचा एक सहकारी एन्काऊंटरमध्ये मारले गेले.