अतीक अहमद याच्या मुलाचा असद अहमदचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊन्टरमध्ये खात्मा केला आहे. त्याच्या एन्काऊन्टरनंतर पोलिसांनी अतीकची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने या पोलिसांनाच धमकी दिली आहे.ज्यांनी माझ्या मुलाला मारला त्यांना जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी दाखवतो. मिशा पिळत अतीक अहमदने ही धमकी दिली आहे. अतीक अहमद धमकी देत असताना त्याच्या संपूर्ण गँगचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. अतीक अहमदचा भाऊ अश्रफ याच्या सद्दाम नावाच्या एका नातेवाईकाविरोधात पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
उमेश पाल हत्येचा कट रचल्याचे अतीकने कबूल केले
राजू पाल हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या उमेश पाल याच्या हत्येचा कट आपणच रचल्याचे अतीक अहमद याने मान्य केले आहे. तुरुंगात बसूनच आपण हा कट रचल्याचे त्याने म्हटले आहे. आपण आपली बायको शाईस्ता हिलान नवा मोबाईल आणि नवे सिम कार्ड घेण्यासही सांगितल्याचे त्याने मान्य केले. उमेश पालवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि पहिले अंगरक्षकाला ठार मारायचं आणि नंतर उमेश पालची हत्या करायची हे ठरलं होतं असं अतीकने सांगितलं आहे.देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असदचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. गुरुवारी त्याचा आणि साथीदाराचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मात्र तत्पूर्वी दीड महिने दोघेही पसार असताना त्यांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गुंड अबू सालेम याच्या शार्पशूटर्सनी मदत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुणे पोलिसांकडूनही खातरजमा करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची गँगस्टर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम यांनी हत्या केली होती. त्यानंतर मागील दीड महिन्यापासून ते पोलिसांना चकमा देत गायब झाले होते. त्यांना वाचविण्यासाठी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद प्रयत्न करीत होते. दरम्यान, अशरफने गुंड अबू सालेम याच्या साथीदारांच्या मदतीने असद आणि गुलामला राहण्यासाठी पुण्यासह नाशिकमध्ये मदत केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असद, गुलाम पुण्यात राहिले पोलिसांपासून वाचण्यासाठी गँगस्टर असद आणि गुलाम दोघेही कानपूर, नोएडा, दिल्लीत राहिले. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अतिक अहमदने मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलामची गुंड अबू सालेमच्या साथीदारांच्या मदतीने नाशिक आणि पुण्यात वास्तव्याची सोय केली. अबू सालेम आणि अतिक यांची जुनी मैत्री असल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.गँगस्टर असद आणि गुलाम दोघेही पुण्यात राहिल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून विविध स्तरावर माहिती गोळा केली जात आहे. दोघेही गँगस्टर पुण्यात नेमके कुठे राहिले, त्यांना पुण्यात राहण्यास कोणी मदत केली, गँगस्टर आणि गुंड अबू सालेम यांच्या साथीदारांचे नेमके कनेक्शन काय आहे याची माहिती पुणे पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे.