नवी दिल्ली – शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 40-45 जागा लढवण्याची योजना आखत आहे,अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.या संबंधात अंतिम निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत एक बैठक बोलावली आहे. गोवा, मेघालय आणि मणिपूर यांसारख्या राज्यांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अपयशामुळे या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच काढून घेण्यात आला आहे.
तो दर्जा परत मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, त्यातूनच पक्षाने कर्नाटकात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला घड्याळाचे चिन्ह मिळावे, अशी मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याचा पक्षाचा विचार असल्याचेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.विरोधी ऐक्याबाबत कालच पवारांची कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटकात निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे कर्नाटकात कॉंग्रेसला नुकसान होऊ शकते. कारण त्यांच्यात होणाऱ्या मतविभागणीमुळे भाजपला लाभ होऊ शकतो, असेही एक अनुमान आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.