मुंबई, 14 एप्रिल : सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चर्चा देखील सुरू झाली आहे. विरोधकांकडून भाजपविरोधात मजबूत आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सजंय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच 2024 ची निवडणूक विरोधक एकत्र लढणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आम्ही राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा जिंकू असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? दरम्यान सत्ताधाऱ्यांसोबतच आता विरोधकांकडून देखील 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर येणार आहेत. मात्र या सर्वांमध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, अजून असं काही ठरलं नाही.नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत की आणखी कोणी हा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. 40 जागा जिंकण्याचा दावा पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आगामी लोकसभेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. राज्यातील 48 जांगापैकी 40 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. शरद पवार, राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट चांगले संकेत आहेत. शरद पवार यांनीच राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.