देशभरात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत असताना बिहारमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. भीम आर्मीचे जिल्हा समन्वयक आणि दलित सेनेचे राष्ट्रीय महासचिव राकेश पासवान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.वैशाली जिल्ह्यातील लालगंज तालुत्यातील पंचदमिया येथे गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.राकेश पासवान यांच्या निर्घृण हत्येनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. भीम आर्मीचे समर्थक रस्त्यावर उतरले असून लोकांचा आक्रोश पाहून पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. एसपी आणि एसडीपीओसह मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी राकेश पासवान घराच्या उंबऱ्यामध्ये बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या.दुचाकीवरून आलेले हल्लेखोर आधी त्यांच्या पाया पडले आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकूण 20 गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या राकेश पासवान यांच्या छातीतून आरपार गेल्या.गोळीबारानंतर आरोपी राकेश पासवान यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून फरार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे संतापलेल्या समर्थकांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि शवविच्छेदनाआधीच मृतदेह घेऊन समर्थक माघारी परतले. राकेश पासवास यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच समर्थकांनी रस्त्यावर
उतरून मुख्य बाजारपेठ बंद केली. यामुळे तणाव आणखी वाढला.
दरम्यान, राकेश पासवान यांच्या पुतणी हल्लेखोर याआधीही घरी आल्याचे पोलिसांना सांगितले. चार हल्लेखोर होते आणि त्यांनी अनेक राउंड गोळ्या झाडल्याचे तिने सांगितले.घटनास्थळावरून काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.