महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार एकाच खात्यात तीन वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांची दुसऱ्या खात्यात बदली होणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेत मात्र राजकीय मंडळींच्या वरदहस्तामुळे अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करताना दिसून येत आहेत. दरम्यान, बदल्या करणाऱ्या सामान्य प्रशासन विभागातच अनेक वर्षांपासून तेच अधिकारी असल्याचे दिसून येतात. त्यामुळे पालिकेच्या कामात अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आता सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेतील (PMC) कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या करण्यासाठी प्रशासनाला आता वेळ मिळाला आहे. त्यानुसार १३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्यानंतर सहा संवर्गातील ६४६ सेवकांच्या बदल्या करण्याचे नियोजन तयार आहे. पुढच्या आठवड्यात या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती आहे. यात अधिकाऱ्यांत प्रशासन अधिकारी, उप अधीक्षक, लिपिकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या नियमानुसार एका विभागात तीन वर्ष सेवा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची दुसऱ्या खात्यात बदली होणे आवश्यक आहे. त्यानुसार एकूण पदांपैकी दरवर्षी २० टक्केच बदल्या करता येतात. मात्र त्याही बदल्या गेल्या अनेक वर्षापासून झाल्या नसल्याचे चित्र पुणे पालिकेत आहे. राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अनेक कर्मचारी महत्वाच्या टेबलवर वर्षानुवर्षे काम करत असल्याचे दिसून येतात. त्यांच्या बदल्या झाल्या नसल्याने प्रशासकीय कामात अडसर निर्माण होत आहे. महत्वाच्या ठिकाणी बदली करण्यासाठी महापालिकेत लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची टीकाही झाली.
आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात ३१ मार्च २०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यात प्रशासन अधिकारी, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंत्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेला आहे. यावर पुढील आठवड्यात कार्यवाही होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे काम करणाऱ्या सामान्य प्रशासन विभागातील चित्र विचित्र असल्याची टीका होत आहे. सामान्य विभागात असे अनेक कर्मचारी आहेत ते १० वर्षापासून तेथे कार्यरत आहेत. पालिकेतील महत्वाच्या टेबलांवर त्यांचीच वर्णी आहे. त्यांच्याशिवाय अधिकाऱ्यांकडे फाइल जात नाहीत. त्यामुळे या बदल्यांमध्ये प्राधान्याने या विभागातील बदल्या झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
या बदलीपात्र पदाच्या होणार बदल्या:–
लिपिक टंकलेखक – २७४
वरिष्ठ लिपिक – ११२
वरिष्ठ लिपिक – १३९
उपअधीक्षक – ९९
शाखा अभियंता – १८
प्रशासन अधिकारी – ४