बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळी १० वाजेपासून GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत. येथील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे.

केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी करण्यात येतोय. आता भाजप नेत्या आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

अधिक वाचा  शिवडी विभागाच्या वतीने भीममहोत्सव-२०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न

बीडमध्ये खळबळ
पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र नेमकी कोणत्या कारणासाठी ही चौकशी सुरु आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भाजपचे दिग्गज नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पंकजा मुंडे कुठे आहेत?
पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांतून चर्चेत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे उपस्थित आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलं होतं. विशेष म्हणजे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रीदेखील याच मंचावर उपस्थित होते. भगवानबाबा भक्त आणि येथील समाजासाठी धनंजय मुंडे- पंकजा मुंडे बंधू भगिनी एकत्रित आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं. राजकीय दुरावा असला तरीही समाजासाठी आम्ही एकत्र येऊ, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.

अधिक वाचा  नितीन गडकरींचा गडचिरोली नक्षलविरोधी ‘मेगा प्लॅन’! परिस्थिती अत्यंत बिकट होती ‘ही’ संख्या 1 लाख करायचीय