एप्रिल महिन्यात तापमानाने नवीन रेकॉर्ड केला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील गोनेगंडला गावात घरांच्या मध्येच असलेल्या खडकाला कडाक्याच्या उन्हामुळे तडा गेल्याने सुमारे 150 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. कुर्नूलच्या जिल्हाधिकारी सृजना गुम्मल्ला यांनी सांगितलं की, ही घटना अदोनी उपविभागात मंगळवारी घडली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खडकाच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 150 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, ‘खडकाला भेगा पडल्या आहेत पण सुदैवाने मंगळवारपासून भेगा वाढल्या नाहीत. तरी खडक तुटून पडण्याचा धोका आहे…आम्ही घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) टीम तैनात केली आहे.
गुम्मल्ला यांनी सांगितलं की, तुटलेलं खडक स्थिर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपासचे सिमेंट कारखाने आणि अक्षय ऊर्जा कंपनी ग्रीनको यांचीही मदत घेतली आहे. त्यांनी सांगितलं की, सुरक्षेच्या दृष्टीने या भागातून बाहेर काढण्यात आलेल्या कुटुंबांना जवळच्या शाळेत ठेवण्यात आलं आहे. कारण शाळा उताराच्या विरुद्ध बाजूस आहे. परिस्थिती बिघडल्यास त्यांच्या घरावर दगडाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे.. खडकाला भेगा पडण्याच्या कारणाबाबत जिल्हाधिकार्यांनी सांगितलं की, आजूबाजूला इतर कोणतीही संशयास्पद कृत्ये घडत नसल्यामुळे परिसरात तीव्र उष्णता हे कारण असू शकतं.
मात्र एका हवामान अधिका-याने सांगितलं की कुर्नूल जिल्ह्यात मंगळवारी असामान्य उच्च तापमानाची नोंद झाली नाही. तर आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (APSDMA) ने सांगितलं की गोनेगंडला येथे काल 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दरम्यान, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांचे पथक गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अतिरिक्त महासंचालक जनार्दन प्रसाद यांनी सांगितलं की, बुधवारी सकाळपर्यंत त्यांच्या विभागाला या घटनेची माहिती नव्हती.