बालभारती ते पौड रस्त्याचे काम व सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांचे काम ३२० कोटी रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. या कामांसाठी पुणे शहरातील वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. हे पुण्याच्या पर्यावरणाचा -हास करणारे आहे, ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठया प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भू-जल पातळीही मोठया प्रमाणात कमी होणार आहे.
सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका वेगळ्याच संकटात ओढत आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा याबाबत आमची मागणी आहे. परंतु टेकडया फोडून, पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून नाही. वेताळ टेकडी वाचविण्यासाठी दि. १५ एप्रिल रोजी सायं ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, यांच्या समवेत बैठक झाली, यावेळी उपशहर प्रमुख आनंद मंजाळकर, विभागप्रमुख प्रविण डोंगरे उपस्थित होते, या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिनजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. दि १५ एप्रिलच्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.