पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेच्या निवडणुकांच्या चर्चेला उधाण आलं आहे. एकिकडे मविआसह भाजपने अद्याप लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात कोणताही विचार नाही असं म्हटलं होतं. मात्र, दुसरीकडे उमेदवारांच्या नावांच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच पुण्यात थेट भाव खासदार म्हणून एका राष्ट्रवादी नेत्याचे पोस्टर व्हायरल झालं आहे.
भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.
दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून पुण्यनगरीचे भावी खासदार प्रशांत जगताप अशा आशयाची बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बॅनरवरून स्पष्ट होत आहे.
भाजपकडून तीन नावं चर्चेत
भाजपकडून देखील लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारंची चाचपणी सुरू आहे. भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव चर्चेत आहे.
सुरुवातील शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र ही नावं मागे पडली असून, स्वरदा बापट आणि मोहळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.