मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांसह अयोध्येचा दौरा केला. सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीला जात असताना मध्येच अयोध्येत हजेरी लावली. यामुळे हा दौरा भाजपच्या आमदार, समर्थक आमदारांनाही करता आला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. या वेळी राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपाचे बाहुबली खासदार बृजभूषण सिंह देखील उपस्थित होते.
राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्तेत आलेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होतेय. कार सेवक असतानाची अयोध्या मला आठवतेय. माझ्या डोळ्यासमोरून तरळतेय. आपण हयात असताना हे व्हावे असे वाटत होते. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मुख्यमंत्री शिंदेंमुळे योग जुळून आला, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानतो. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थितांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांमधून रावण असे उत्तर आले. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो, असे शिंदे म्हणाले.