तेल वायू आणि दूरसंचार व्यवसायानंतर आता देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या उन्हाळ्यात रिटेल क्षेत्रात दहशत निर्माण करण्याची पूर्ण तयारी केली आहे. गेल्या महिन्यात त्यांचा कोल्ड्रिंक ब्रँड कॅम्पा कोला लाँच केल्यानंतर, अंबानी आता उन्हाळ्यातील आणखी एका व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. आणि तो म्हणजे आइस्क्रीम व्यवसाय. मिळालेल्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आइस्क्रीम बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.
लवकरच रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची FMCG कंपनी, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स, त्याच्या इंडिपेंडन्स ब्रँडसह आइस्क्रीम व्यवसायात प्रवेश करू शकते. तुमच्या माहितीकरता, कपंनीने गेल्या वर्षी इंडिपेंडेंस ब्रँडलॉन्च केला होता, ज्यात मसाले, खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये आणि पॅकेज्ड फूड या सर्व खाद्यपदार्थांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स आईस्क्रीम बनवण्याचे काम आउटसोर्स करण्यासाठी गुजरातमधील एका कंपनीशी बोलणी करत आहे.
रिलायन्सने नुकतेच डेअरी क्षेत्रातील दिग्गज आरएस सोढी यांची निवड केली आहे. सोढी यांनी अनेक वर्षे अमूलमध्ये काम केले आहे. या नव्या उपक्रमात सोढी यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारतातील आइस्क्रीमचा व्यवसाय सुमारे 20000 कोटींचा आहे, ज्यामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा जवळपास निम्मा आहे. अमूल, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स या कंपन्या येथील बाजारपेठेत आघाडीवर आहेत. याशिवाय प्रादेशिक स्तरावर अनेक कंपन्या पश्चिम आणि दक्षिण भारतात जोरदार व्यवसाय करत आहेत.
वृत्तपत्रानुसार, रिलायन्स या व्यवसायात थेट पाऊल टाकणार नाही. त्याऐवजी गुजरातमध्ये बनवलेली मोठी कंपनी विकत घेऊ शकते. या कंपनीसोबत रिलायन्सची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कंपनी या उन्हाळ्यात आपले आईस्क्रीम लाँच करू शकते. कंपनी तिच्या समर्पित किराणा किरकोळ आउटलेट्स Jio Mart द्वारे आइस्क्रीम विकू शकते.