संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये येत्या 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. मात्र, संभाजीनगरातील किराडपुरा भागात दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे ही सभा होणार का नाही? याबाबतची साशंकता व्यक्त केली जात होती. या सभेला पोलीस परवानगी देतील की नाही? असा सवालही केला जात होता. या सभेला परवानगी द्यायची की नाही हा निर्णय पोलिसांचा आहे. पोलिसांनी नकार दिल्यास सभा होणार नाही, असं भाजपचे नेते सांगत होते. तर सभा होणारच, असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यासाठी पोलिसांनी एकूण 15 अटी घातल्या आहेत.

संभाजीनगर पोलिसांनी अखेर महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यासाठी एकूण 15 अटी घातल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडीची संभाजीनगरात संयुक्त सभा होत आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सभेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. राष्ट्रवादीचे इतर प्रमुख नेते या सभेला हजेरी लावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अधिक वाचा  ‘ब्राह्मणांनो महिलांना सोडा, इतकी सभ्यता…,’ अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट, म्हणाला ‘तुमचे संस्कार…’

सभेसाठीच्या काही अटी

सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्या. सभेचं ठिकाण आणि वेळेत बदल करू नका.

सभेसाठी येणाऱ्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये

सभेला येताना शस्त्र, तलवारी स्वत: जवळ बाळगू नये, शस्त्रांचं प्रदर्शन करू नये

सभा स्थळावर कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. जास्त गर्दी जमवू नये

सभास्थळी ढकलाढकली, गोंधळ. चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरलं जाईल

सभेमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. रस्ता बंद राहू नये

सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याच्या सूचना द्याव्यात

अधिक वाचा  बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! खेळाडू मालामाल! ही नावं वगळली या नव्या चेहऱ्यांचा समावेश संपूर्ण यादी

सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल किंवा कार रॅली काढू नये

सभेसाठीच्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबत कोर्टाच्या निर्देशाच्या मर्यादांचं पालन करावं

स्टेज उभारण्याआधी संबंधित ठेकेदारानं स्टेज स्टॅबिलिटी प्रमाणपत्रं पोलिसांकडे सादर करावं.

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सभा होणार नसल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेची कुठेच व्होट बँक रिहील नाही. ही मते घेऊ की ती मते घेऊ असं त्यांचं चाललं आहे. त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

सभेबाबत काय करायचं याची प्रशासन काळजी घेईल. प्रशासन शहरावर लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी किंवा गुप्तचर विभागाने काही गुप्त रिपोर्ट दिले, आणि सभेमुळे गोंधळ होईल असं सांगितलं तर ही सभा थांबवली जाईल. त्याबाबत पोलीस आणि सरकार निर्णय घेईल. सभेला परवानग्या नाकारतील. सर्व चौकशी सुरू आहे. सभेने शहरात परिणाम होईल की नाही होणार याची माहिती घेतली जात आहे. पोलीस प्रशासनावर जबाबदारी आहे. त्यांनी म्हटलं तर सभा होणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

अधिक वाचा  सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक, उधमपूर भागात जोरदार धुमश्चक्री, एका जवानाला वीर मरण, सर्च ऑपरेशन सुरू