ऐन रमजानचे दिवस सुरु असतानाच पाकिस्तानात मात्र गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या समस्या दिवसेंदिवस कमी न होता त्या वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. रमजानच्या काळातही साध्या साध्या गोष्टींसाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती किती गंभीर बनली आहे, त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाकिस्तानातील नागरिक पिठाने भरलेल्या ट्रकवर तुटून पडली आहेत.
व्हिडीओमधील ही घटना आहे पेशावरमधील. पिठाने भरलेला हा ट्रक लोकांना मोफत पीठ देण्यासाठीच आला होता. मात्र काही वेळातच ट्रकमध्ये असलेल्या पिठाच्या पोत्यांपेक्षा त्याठिकाणी कित्येक लोकं जमा झाली होती. गर्दीत उपस्थित असलेल्या अनेकांनी ट्रकवर चढून पिठाची पोती खेचून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच पिठाने भरलेला ट्रक सगळा खाली झाला. पाकिस्तानातील माध्यमांनी खैबर पख्तूनख्वा सरकारने रमजान पॅकेज अंतर्गत गरीब लोकांना मोफत पीठ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सरकारने 19 अब्ज पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणाही केली होती.
या योजनेचा लाभ राज्यातील 92 टक्के लोकांना मिळणार असल्याचे कार्यवाह प्रांतीय अन्न मंत्री फजल इलाही यांनी सांगितले होते. पाकिस्तानातील प्रत्येक गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी देशाच्या गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रमजान पॅकेजचीही घोषणा करण्यात आली होती.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये शहरी भागात महागाई 41.9 टक्के आणि ग्रामीण भागात 47 टक्के झाली आहे. गेल्या वर्षी मात्र हे चित्र अनुक्रमे 14.3 टक्के आणि 14.6 टक्के होते. मात्र अलिकडेच, पाकिस्तानचे राज्य अर्थमंत्री असलेले तैमूर खान यांनी सांगितले होते की, यावेळी एका पीठाच्या पॅकेटची किंमत 800 रुपये होती, ती वाढून 3 हजार 100 रुपये झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य माणसांना आता जगणं मुश्किल झालं आहे.