शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या (दि.26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांची खेड नंतर आता मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधीच उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेत बॅनर झळकले आहेत. त्यामुळे या बॅनरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे शिवसेनेतील बंडानंतर पहिली जाहीर सभा घेतली. त्यानंतर आता ठाकरे हे मालेगावात दुसरी जाहीर सभा घेत आहेत. मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्यामुळे उद्धव ठाकरे हे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  मध्यम व गरीब ३०० युनीट वीज वापरणा-या अशी मोफत वीज: शेतकरी मोफत वीजेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

दरम्यान, राज ठाकरे यांची नुकतीच शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रोजच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींवर ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.