काँग्रेस खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टरवर ‘जोडे मारा’ आंदोलन केल्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांतील संबंधित आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे संकेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. तर विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

काँग्रेस खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करताना गुरुवारी सत्ताधारी पक्षांतील काही आमदारांकडून राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. याप्रकरणी काँग्रेसचे आमदार शुक्रवारी विधानसभेत आक्रमक झाले. विधानसभेचे नियमित कामकाज सुरू होताच नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. हा सर्व प्रकार गंभीर असून गुरुवारी झालेल्या आंदोलनामध्ये तालिका अध्यक्षांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याविरोधात भाजपचे आशीष शेलार यांनी विरोधकांच्या आंदोलनाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. गुरुवारी झालेल्या घटनेचे समर्थन करण्यात येणार नाही. असंसदीय प्रकार आम्हाला मान्य नाही. परंतु आठ महिन्यांपासून विरोधकांकडून खोके आणि गद्दार सरकार बोलले जाते, त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली. यामुळे सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी सुरू करीत ‘मोदी सरकार चोर हैं’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारांमुळे विधानसभेचे कामकाज प्रथम २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज एकूण तीन वेळा तहकूब करण्यात आले.

अधिक वाचा  जिवंत शिवसैनिकाला अखेर स्मशानात जाऊन तिरडीवर झोपावं लागलं, कारण….

सभागृह सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. ‘विधान भवनाच्या आवारात गुरुवारी घडलेली घटना चुकीची होती, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. त्याचप्रमाणे सभागृहात काही सदस्यांकडून पंतप्रधानांबाबत जे वक्तव्य करण्यात आले, तेही चुकीचे आहे, शोभनीय नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाजमंत्री आणि इतर दोन्ही बाजूंच्या सदस्यांसोबत माझी चर्चा झाली. सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल,’ असे नार्वेकर यांनी जाहीर केले.

अपमान सहन करणार नाही : मुख्यमंत्री

गुरुवारच्या घटनेचे समर्थन करता येणार नाही. पण शुक्रवारी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा देशाचा अपमान आहे. गेली आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून त्यांना गद्दार म्हणणे, खोके म्हणणे, मिंधे म्हणणे हे कोणत्या आंचारसंहितेत बसते, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना केला. सावरकरांचा वारंवार अपमान करणे, हे देखील देशद्रोह्यांचेच काम आहे. देशाची किर्ती जगभरात पोहोचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता कधीच सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका