नांदेड, 20 मार्च : आरोग्याचे प्रश्न समोर येतात तेव्हा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचाही त्यामध्ये समावेश असतो. ज्याबाबतचा त्रास असेल, त्यावर उपाय म्हणून डॉक्टर हे त्यासंबंधीची शस्त्रक्रिया करत असतात. मात्र, नांदेडमधून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. नांदेड एका शस्त्रक्रियेदरम्यान, जे घडलं, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.नेमकं काय घडलं – नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील कल्पना दमयावर या महिलेला पोट दुखीचा नेहमी त्रास होत होता. त्यामुळे पोट देखील सुटले होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोट दुखीचा त्रास असल्याने नातेवाईकांनी त्या महिलेला गोवर्धन घाट रोडवरील तोटावार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी जे घडलं, त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आशा तोटावार यांनी नातेवाईकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.त्यानंतर महिला डॉक्टरांनी 2 तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर त्यांनी पाहिलं की, महिलेच्या पोटात तब्बल 10 किलोचा गोळा तयार झाला होता. 2 तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 35 वर्षीय कल्पना यांच्या पोटातून हा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. यावेळी सुरुवातीला महिलेच्या उजव्या अंडाशयावर गाठ तयार झाली होती. त्यानंतर हळूहळू ही गाठ मोठी झाली आणि पोटात गोळा तयार झाला. यावेळी अंडाशयाचा चक्क 10 किलोचा गोळा
काढून डॉक्टरांनी संबंधित महिलेचे प्राण वाचले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला होता.