मुंबई दि. २० (प्रवीण रा. रसाळ) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या आधी इथल्या समाजाने महिलांना गुलाम म्हणून संबोधले होते व त्यांचा छळ ही करण्यात येत होता, तेव्हा पुरुषांप्रमाणे महिलांना समान अधिकार देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी जगात पहिल्यांदाच त्याना मतदानाचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला” असे प्रतिपादन जागतिक महिला दिन आणि माता रमाई १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत असताना स्वाती सुर्वे (IBAS) यांनी केले.
सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ भोईवाडा परिसर यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिन व माता रमाई १२५वा जयंती महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम विकिता विवेक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धजन पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर प्रसंगी स्वाती सुर्वे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की “आजही विश्व स्तरावर महिलांचा छळ सुरू आहे, या महिलांना सक्षम करण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले असता त्याला विरोध करण्यात आला म्हणून महिलांच्या न्यायहक्कांसाठी बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर महिलांसाठी चार कायद्याची निर्मिती करण्यात आली आणि आज जे अधिकार महिलांना प्राप्त झाले आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे झालेले आहेत” असे प्रतिपादन त्यांनी केले.सदर प्रसंगी कुमारी पायल सोनवणे हिने माता रमाई बद्दल आपले विचार व्यक्त केले त्याचबरोबर मिलन जाधव मॅडम यांनी सुंदर असे गीत सादर केले, व दिलीप जाधव आणि संच यांनी बाबासाहेब रमाई यांच्यावरची सुंदर अशी गीते सादर करून कार्यक्रमाला रंग भरला, सदर प्रसंगी उपाध्यक्षा उज्वला गायकवाड, सचिव निशा कदम, उपसचिव सारिका चंदनशिवे, आरती चंदनशिवे, नीता रणपिसे, अर्पणा सकपाळ, हिशोब तपासणीस संध्या तांबे, सुप्रिया जाधव, कार्याध्यक्ष वृषाली चंदनशिवे, राजश्री सोनावणे, उषा गमरे, सल्लागार शारदा सावंत व तमाम महिला सभासदांनी तुफान गर्दी केली होती.
सरतेशेवटी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्या बद्दल सर्व महिला मंडळाचे आभार मानून अध्यक्षा विकिता जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.