सुप्रसिद्ध गझलकार कै अनिल कांबळे यांनी जाहीर केलेल्या पुरस्काराची वचनपूर्ती साहित्यदीप प्रतिष्ठानने केली, अशी घटना साहित्य क्षेत्रात दुर्मिळ आहे या शब्दात आपले विचार डॉ. श्रीपाल सबनीस ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले. निमित्त होते, साहित्यदीप संस्थेच्या ‘काव्यमग्न’ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे. या वेळी व्यासपीठावर ‘साहित्यदीप’ चे सल्लागार कवी वि.सु.चव्हाण आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते. रसिकांमध्ये अनेक मान्यवर ,कवी/कवयित्री उपस्थित होते त्यात रंगत संगत चे श्री प्रमोद आडकर, पुरुषोत्तम सदाफुले, सुदाम मोरे, प्रमोद खराडे, डॉ. दीपक चांदणे, अस्मिता चांदणे, मुरलीधर साठे, प्रवीण दरेकर, सुनीती लिमये, ज्येष्ठ कवयित्री स्नेहसुधा कुलकर्णी, चिन्मयी चिटणीस, वैशाली मोहिते, माधव हुंडेकर, गोपाळ कांबळे, सतीश गायवळ, विजय शेंडगे इत्यादी अनेक उपस्थित होते.
सुप्रसिद्ध गझलकार/कवी अनिल कांबळे यांनी जाहीर केलेले पुरस्कार ,त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ,ते देऊ शकले नव्हते पण ‘साहित्यदीप ‘ चे मार्गदर्शक ,सल्लागार आणि काहीकाळ उपाध्यक्ष राहिलेल्या कांबळे यांच्या या वचनाची पूर्तता काल साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आणि सर्व टिमने केली.
काल १९ मार्च २०२३ रोजी कवयित्री कविता क्षीरसागर ,भाग्यश्री देसाई, कवी राजेंद्र वाघ आणि बबन धुमाळ, यांना ‘काव्यमग्न’ हा पुरस्कार ,एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करून ,’साहित्यदीप’ ने केली वचनपूर्ती आणि याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
सबनीस सर पुढे म्हणाले , ‘ दिवंगत गझलकार अनिल कांबळे यांनी ‘ त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी ‘ ही एकच गझल लिहिली असती तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते. राजेंद्र वाघ यांची मराठीचे गुणगाण गाणारी कविता आणि तिला दिलेली ‘ हापूस ‘ आंब्याची उपमा छान होती. ” भुकेल्यापोटी पाण्यालाही भाकरीचा वास येतो ” ही बबन धुमाळ यांची कल्पना , खऱ्या अर्थाने भुकेची वेदना सांगून गेली. आत्मा आणि परमात्मा यांची सांगड घालणारी कविता भाग्यश्री देसाई यांनी सादर केली. कविता क्षीरसागर यांनी कवितेवरची कविता वाचून कवितेचे महात्म्य विशद केले. पुरस्कार प्राप्त चौघांनीही अतिशय भावपूर्ण मनोगते व्यक्त केली आणि साहित्यदीप चे आभार ही मानले. सुरुवातीला साहित्यदीप च्या अध्यक्ष मा.ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपल्या प्रास्ताविकात, साहित्यदीप ची माहिती सांगताना, संस्थेचा हा १८३ वा कार्यक्रम असल्याचे सांगितले आणि ‘काव्यमग्न’ या पुरस्कारामागची पार्श्वभूमी विशद केली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन कवयित्री शिल्पा जगनाडे यांनी केले.