पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी, पुण्यात कोंढवे धावडे येथील एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. पुणे शहराच्या जवळ पुन्हा बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे.
वारजे माळवाडी भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज सकाळी ८ वाजता पुण्यातील वारजे माळवाडी भागात असलेल्या जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम यांच्यासह वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले.
एका इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये बिबट्या लपलेला होता. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी टाकण्यात आली पण बिबट्याने तिथून पळ काढला. दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कोंढवे धावडेसह हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये बिबट्या पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा व्हिडीओ सीसी कॅमेरात कैद झाला. बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर आहे. यामुळे भागामधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे. मात्र वनविभाग सातत्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याची दहशत या भागात अजूनही पाहायला मिळत आहे.